2100 Rupees Update Ladki Bahin | लाडकी बहीण योजनेला सुरू होऊन आता नेमके एक वर्ष पूर्ण झालं आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही योजना महिलांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की तिचा थेट परिणाम निवडणूक निकालावर दिसून आला. महायुतीला तब्बल 232 जागा, तर महाविकास आघाडीला फक्त 50 जागांवर समाधान मानावं लागलं. या विजयामध्ये महिला मतदारांचा मोठा वाटा असल्याचं राजकीय वर्तुळात सतत बोललं जातं.
योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला ₹1500 जमा होतात. आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. महायुतीने प्रचारादरम्यान हा सन्मान निधी वाढवून ₹2100 करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्या वाढीबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
योजना एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार उत्तर दिलं. विरोधक सातत्याने “लाडकी बहीण योजना बंद होणार” असा आरोप करत होते. यावर फडणवीस म्हणाले की, “५ डिसेंबरला आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. अनेकांनी आम्ही आलो की योजना बंद होईल असं सांगितलं, पण एक वर्ष होत आलं तरी योजना बंद नाही. ही योजना सुरूच राहणार आहे.”
त्याचबरोबर त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली
“आता आम्हाला लखपती दीदी करायची आहे.”
याआधीही त्यांनी एका सभेत, अजून ५० लाख दीदींना लखपती करणार असल्याचं म्हटलं होतं. म्हणजेच ही योजना बंद होण्याऐवजी सरकार तिचं स्वरूप आणखी मोठं आणि प्रभावी करण्याच्या दिशेनं जात असल्याचं स्पष्ट होतं.
लाडकी बहीण योजनेचा प्रवास आता दुसऱ्या वर्षात प्रवेश करतोय. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना किती महत्त्वाची आहे याची जाणीव गावागावातल्या हजारो कुटुंबांना आहे. पुढे योजनेत काय बदल होतात, निधी वाढतो का, “लखपती दीदी”चं स्वप्न कसं आकार घेतं… याकडे राज्यभरातल्या महिलांचे लक्ष लागलं आहे.