Aadhaar Mobile Number Update | आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर बदलायचा म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर एकच चित्र यायचं लांब रांग, गरम उन्हात ताटकळणारे ज्येष्ठ नागरिक, कागदपत्रांचं ओझं… पण आता या सर्व त्रासाला पूर्णविराम मिळणार आहे. UIDAI ने जाहीर केलेल्या नवीन सुविधेमुळे आता नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलण्यासाठी आधार केंद्रात धावपळ करण्याची गरजच राहणार नाही. देशातील कोट्यवधी नागरिकांसाठी ही बातमी म्हणजे मोठा दिलासा आहे.
UIDAI ने नुकतंच ‘AADHAAR’ नावाचं एक नवीन ॲप लॉंच केलं आहे. या ॲपमुळे आता घरबसल्या, कोणत्याही कागदपत्रांशिवाय, फक्त OTP आणि फेस ऑथेंटिकेशन वापरून मोबाईल नंबर अपडेट करता येणार आहे. दुर्गम भागात राहणारे लोक, वृद्ध नागरिक, स्थलांतरित कामगार ज्यांना आधार केंद्रात जाणं कठीण होतं त्यांच्यासाठी ही सुविधा म्हणजे श्वास घेण्यासारखा आराम आहे.
याहूनही मोठी गोष्ट म्हणजे UIDAI लवकरच नाव, पत्ता आणि ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधा देखील या ॲपमध्ये उपलब्ध करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. म्हणजे नागरिकांना आता जवळजवळ कोणत्याही आधार सेवेसाठी बाहेर पडण्याची गरज नाही.
अपडेट कसं करायचं?
नवीन ॲप डाउनलोड करा, आधार नंबर टाका, OTP ने लॉगिन करा, भविष्यासाठी ६ अंकी PIN सेट करा. त्यानंतर ‘माय आधार अपडेट’मध्ये जाऊन ‘मोबाईल नंबर अपडेट’ निवडा. जुना आणि नवीन नंबर OTP ने व्हेरिफाय करा आणि शेवटी फेस ऑथेंटिकेशन करा. फक्त ₹75 भरल्यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण!
कॅमेऱ्याकडे शांतपणे पाहून एकदा डोळे उघडणे-बंद करणे इतकं सोपं फेस ऑथेंटिकेशन ठेवण्यात आलं आहे. संपूर्ण प्रक्रिया अगदी काही मिनिटांत पूर्ण होते.
मोबाईल नंबर अपडेट करणं इतकं महत्त्वाचं का?
आज आधार हा देशातील सर्वात मोठा ओळखपत्र आहे. बँकिंग, सबसिडी, आयकर, डिजीलॉकर, सरकारी योजना सगळीकडे OTP लागतो. मोबाईल नंबर बंद झाला, हरवला किंवा वापरात नाही, तर अर्ध्या गोष्टी थांबतात. त्यामुळे मोबाईल नंबर अपडेट करणं म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्याची सुरक्षितता वाढवण्यासारखं आहे.
नवीन आधार ॲपची खास वैशिष्ट्ये
UIDAI चं हे ॲप खूप पुढारलेलं आहे
एकाच मोबाईलमध्ये कुटुंबातील ५ आधार ठेवता येतात.
फेस स्कॅन शेअरिंग – पिन आणि OTP पेक्षा अधिक सुरक्षित.
सिलेक्टिव्ह शेअरिंग – फक्त हवी तीच माहिती शेअर करा.
ऑफलाइन वापर – इंटरनेट नसलं तरी आधार पाहता येईल.
बायोमेट्रिक लॉगिन – सुरक्षितता हाच सर्वांत मोठा आधार.
हा बदल फक्त तांत्रिक नव्हे, तर भावनिकही आहे. आधार केंद्रांवरची गर्दी कमी होईल, ज्येष्ठ नागरिकांना त्रास कमी होईल, ग्रामीण भागातील लोकं तासन्तास प्रवास न करता आपलं काम घरातून करू शकतील. हा निर्णय खरोखरच देशातील सर्वसामान्य नागरिकाला तंत्रज्ञानाचा अधिकार देणारा आहे.