Maharashtra Railway Project | महाराष्ट्रात रेल्वे जाळ्याचा विकास आता कधी नव्हता इतक्या वेगाने होतोय. राज्यसभेत केंद्राचे रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जे आकडे मांडले, ते ऐकून सामान्य माणूसही थक्क होईल अशी परिस्थिती आहे. कारण गेल्या दशकभरात महाराष्ट्राच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सरकारने केलेली गुंतवणूक तब्बल 20 पट वाढली आहे. 2009 ते 2014 या काळात वार्षिक 1,171 कोटी खर्च होत होता, तो आता थेट 2025-26 मध्ये 23,778 कोटींवर पोहोचला आहे. याच वाढीच्या जोरावर राज्यभरात आधुनिकीकरणाची प्रचंड कामे द्रुतगतीने होत आहेत.Maharashtra Railway Project
केंद्राकडून महाराष्ट्राला मिळालेल्या मोठ्या पाठबळामुळे 1 एप्रिल 2025 पर्यंत 5,098 किमी लांबीचे 38 प्रकल्प (11 नवीन मार्ग, 2 गेज रूपांतरण, 25 दुहेरीकरण) मंजूर झाले आहेत. या प्रकल्पांवर तब्बल 89,780 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, उद्योगपती सगळ्यांसाठीच रेल्वेचं हे जाळं म्हणजे मोठा दिलासा ठरणार आहे.
राज्यातील काही महत्त्वाचे सुरू असलेले नवीन मार्ग प्रकल्प म्हणजे अहिल्यानगर–बीड–परळी वैजनाथ, वर्धा–नांदेड, इंदूर–मनमाड, वडसा–गडचिरोली, जालना–जळगाव यांसारखे मार्ग. तर दुहेरीकरण आणि तिसरा-चौथा मार्ग वाढवण्याच्या कामांमुळे नागपूर, नाशिक, जळगाव, भुसावळ, कल्याण, मनमाड या विभागात रेल्वे वाहतुकीला मोठं बळ मिळणार आहे. भविष्यकाळात प्रवास आणखी जलद आणि आरामदायी होणार यात शंका नाही.
इतकंच नाही तर गेल्या तीन वर्षांत—2022 ते 2026 दरम्यान—8,603 किमी लांबीची 98 नवीन सर्वेक्षणे देखील मंजूर झाली आहेत. म्हणजे येत्या काळात अजून नवे मार्ग, अजून नवे प्रकल्प आणि अजून मोठ्या गुंतवणुका राज्यासाठी येणार हे स्पष्ट आहे. एकूणच रेल्वे विभागाची चालणारी ही धडाडी पाहिली तर महाराष्ट्राचा रेल्वे नकाशा संपूर्ण बदलणार हे निश्चित.
रेल्वेमार्गांचे नूतनीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरू असून 2014 ते 2025 दरम्यान तब्बल 52,000 किमी मार्गांचे नूतनीकरण झाले आहे. फक्त 2025-26 (नोव्हेंबर 2025 पर्यंत) वर्षातच मध्य रेल्वे, दक्षिण मध्य, दक्षिण पूर्व मध्य, पश्चिम आणि दक्षिण पश्चिम रेल्वे मिळून 1,472 किमी मार्गांचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे.
यासोबतच देशभरात सुरू असलेल्या अमृत भारत स्थानक योजनेत महाराष्ट्रातील 132 स्थानकांचा समावेश असून त्यातील 17 स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. बारामती, लासलगाव, चांदा किल्ला, धुळे, देवळाली, मूर्तिजापूर, लोणंद, माटुंगा यांसारखी अनेक स्थानके नव्या रुपात चमकू लागली आहेत. इतर स्थानकांवर नवीन छप्पर, प्रवेशद्वार, पादचारी पूल, प्रतीक्षागृहे, दिशादर्शक पाट्या, सुशोभीकरण यांसारखी कामे शेवटच्या टप्प्यात आहेत.
वाठार, नांदगाव आणि हडपसर स्थानकांवर तर सर्व कामे जवळजवळ पूर्ण होऊन अंतिम टच दिला जात आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना आता शहरासारखी सुविधायुक्त स्थानके मिळतील हा यातला सर्वात मोठा बदल म्हणावा लागेल.
एकीकडे नवे मार्ग, दुसरीकडे चौथ्या मार्गाची उभारणी, तिसऱ्या मार्गाचे विस्तार, आधुनिक स्थानके, खडीविरहित ट्रॅक, नव्या सर्वेक्षणांचे काम अशा सगळ्यांच्या संगमाने महाराष्ट्राचा रेल्वे प्रवास आता नव्या वेगाने धावतो आहे. आजवर ‘गर्दी, उशीर, जुनाट व्यवस्था’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेकडे आता ‘गती, विकास आणि आधुनिकता’ यांच्या नजरेतून पाहण्याचा काळ आला आहे.
महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यापर्यंत रेल्वे पोहोचण्यासाठी देशाची ही मोठी मोहीम पुढील काही वर्षांत आणखी व्यापक होणार आहे. कारण प्रश्न फक्त रुळांचा नाही तो लोकांच्या जीवनमान उन्नतीचा आहे. प्रवास, व्यापार, रोजगार आणि विकास… सगळं काही रेल्वेमुळे जोडून जातं. आणि तेच आता महाराष्ट्रात प्रत्यक्षात घडताना दिसत आहे.