Maharashtra Loan Waiver | गेल्या काही वर्षांत राज्यातील शेतकरी अक्षरशः नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक अडचणींच्या कचाट्यात सापडला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर, पिकांची सतत होणारी नासाडी… त्यात कांदा, सोयाबीन, तूर, फळे-भाज्यांना दर नाही. उसाची एफआरपीसुद्धा वेळेवर नाही. रोजचा खर्च, घर चालवणं, मुलांचं शिक्षण… सगळंच ढासळायला लागलं. या सगळ्या दबावात दररोज सहा-सात शेतकरी आत्महत्या करतात, अशी सरकारी आकडेवारीच सांगते. नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागावर याचा सर्वाधिक परिणाम दिसतो.
या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पावलं उचलली आहेत. शेतकऱ्यांचं नियमित कर्ज भरणं का थांबतं? बँकांची थकबाकी वारंवार का वाढते? कोणत्या प्रकारची कर्जमाफी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देऊ शकते? या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष समिती तयार करण्यात आली आहे. १० एप्रिलपर्यंत ही समिती सरकारला सविस्तर अहवाल देणार आहे. त्यानंतर संपूर्ण कर्जमाफीची घोषणा अपेक्षित आहे.
३० जूनपूर्वी मिळणार संपूर्ण कर्जमाफी कृषीमंत्र्यांची घोषणा
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट सांगितलं की
👉 अभ्यास समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सरकारकडे जमा होईल
👉 मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मिळून अंतिम निर्णय घेतील
👉 ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेल
यासाठी सहकार विभागाकडून जिल्हानिहाय थकबाकीची माहिती मागविली आहे, ज्यावरून अचूक योजना आखली जाणार आहे.
राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकी
जिल्हा थकबाकीदार शेतकरी थकबाकी
सोलापूर २,७१,९७३ ३,९७६ कोटी
जालना १,७२,६४८ १,९९२ कोटी
बुलढाणा १,६७,२७३ १,४७१ कोटी
नांदेड १,६५,३१२ १,२६८ कोटी
यवतमाळ १,५२,५६१ २,४२२ कोटी
परभणी १,५२,२०७ १,५०० कोटी
बीड १,१९,१८८ १,४६४ कोटी
अमरावती १,१७,४०२ १,३६० कोटी
छ. संभाजीनगर १,०४,५२९ १,६०० कोटी
वर्धा ९३,५३२ ९८३ कोटी
नाशिक ८१,७९७ २,८२९ कोटी
धाराशिव ५२,७१६ १,०९३ कोटी
शेतीकर्जाची सद्यस्थिती – एक नजर
राज्यातील एकूण शेतकरी: १,३३,४४,२०९
एकूण कर्जवाटप: २,७८,२६५ कोटी
थकबाकीदार शेतकरी: २४,७३,५६६
एकूण थकबाकी: ३५,४७७ कोटी
२०१७ मध्ये दीड लाखांची, तर २०१९ मध्ये दोन लाखांची कर्जमाफी जाहीर झाली होती. मात्र, रकमेची मर्यादा असल्याने अनेक शेतकरी त्या योजनांपासून वंचित राहिले. यावेळी मात्र “संपूर्ण कर्जमाफी” असा शब्दप्रयोग वापरल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.
समारोप : आशेचा किरण की पुन्हा एक आश्वासन?
कर्ज, थकबाकी, नैसर्गिक संकटं आणि बाजारभावातील घसरण – या सगळ्यांच्या ओझ्याखाली शेतकरी दबून गेला आहे. ३० जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी दिली गेली, तर हजारो कुटुंबांना दिलासा मिळेल. नाहीतर ही घोषणा देखील आधीच्या अनेक घोषणांसारखी कागदावरच राहण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आजही कायम आहे.