Panjab Dakha Havaman Andaj: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान गोंधळलेलं चाललंय. कधी ढग तर कधी उन्हं, आणि या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या मनात नेहमीच एक प्रश्न राहतो की पुढचा दिवस कसा असेल. अशातच हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी २ डिसेंबरला दिलेल्या नव्या अंदाजामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं लक्ष हवामानाकडे वळलं आहे. दरवर्षीच्या अनुभवानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थोडाफार अवकाळी दिसतोच, आणि त्याच पद्धतीने यंदाही २ ते ७ डिसेंबरच्या दरम्यान काही भागात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस दिसू शकतो, असं त्यांनी सांगितलं आहे. Panjab Dakha Havaman Andaj
आज (२ डिसेंबर) दिवसभर राज्यात ढगाळ वातावरण जाणवणार आहे पण पावसाची भीती शेतकऱ्यांनी मनात धरू नये, कारण हा पाऊस सगळीकडे नाही येत. फक्त काही ठिकाणी थोडेसे थेंब जाणवतील इतकंच. महाराष्ट्राच्या आसपासची चार राज्यं आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक — येथे ३, ४ आणि ५ डिसेंबरच्या दरम्यान पाऊस येणार आहे. याचा किनाऱ्यालगतच्या आणि सीमावर्ती महाराष्ट्रावर थोडाफार परिणाम दिसू शकतो. विशेषतः सोलापूरच्या अक्कलकोट-जतकडील भागात, सांगली, कोल्हापूरच्या शिरोळ भागात, सातारा, पुण्यातील दौंड, आणि बीड जिल्ह्याच्या कडा–आष्टी भागात ढगाळ वातावरण आणि फक्त बोटावर मोजण्याइतका पाऊस जाणवू शकतो.
हा पाऊसही काही खोलवर जाणारा किंवा नुकसान करणारा नाही. फक्त काही गावांपुरता आणि तोही क्षणभराचा. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचं कारण नाही. याशिवाय राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, खानदेश, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, कोकण — या सर्व भागांमध्ये पावसाची शक्यता नाही. या भागांत शेतकरी निर्धास्तपणे आपलं काम सुरू ठेवू शकतात.
ढगाळ वातावरण ५ तारखेपर्यंत राहिलं तरी ६ डिसेंबरपासून पुन्हा एकदा स्वच्छ आकाश दिसेल आणि राज्यात थंडीचा प्रभाव वाढू लागेल. दिवसा पडणारी धुई जमिनीवर उतरलेलीही दिसेल आणि रात्रीचा थंड पारा ११–१२ अंशांच्या आसपासच राहणार आहे. या पाराच्या स्थिरतेमुळे पिकांना विशेष फटका बसत नाही.
डख यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे मार्गदर्शनही केलं आहे. हरभरा पिकाला पाणी द्यायचं असल्यास दिलं तरी चालेल. गव्हाच्या पेरणीसाठी अजून १० डिसेंबरपर्यंत वेळ आहे. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिक येथे द्राक्ष, डाळिंब व वेलवर्गीय पिकांवर ढगाळ वातावरण आणि धुईचा थोडाफार परिणाम होतो, त्यामुळे फवारणीचे नियोजन नीट सांभाळायला सांगितलं आहे. तुरीच्या पिकाला मात्र हे ढगाळ वातावरण फुलांसाठी चांगलंच पडेल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.
या डिसेंबरमध्ये थंडी पुन्हा जोरात जाणवेल आणि जवळपास १० जानेवारीपर्यंत राज्यात चांगली थंडी टिकेल अशी शक्यता आहे. शेतकऱ्यांनी हवामानातल्या या बदलांचा अंदाज ठेवून शेतीचं नियोजन केल्यास अनावश्यक नुकसान टाळता येईल. आणि हवामानात अचानक कुठला मोठा बदल दिसला तर ताबडतोब नवा अंदाज दिला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.