Teacher Strike 5 December | राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आजची बातमी खूपच महत्त्वाची आहे. कारण येत्या ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता प्रबळ होत चालली आहे. मुख्याध्यापक महामंडळाने राज्यव्यापी संपाचा थेट इशारा दिल्याने शिक्षणव्यवस्थेत मोठी खळबळ माजली आहे. शिक्षक मोर्चात सहभागी होणार असल्याने त्या दिवशी अनेक शाळांमध्ये शिक्षकच हजर नसण्याची शक्यता आहे आणि परिणामी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय अनेक ठिकाणी घेतला जाऊ शकतो.
मुख्याध्यापक महामंडळाचा मोठा निर्णय
पुण्यात झालेल्या महत्वाच्या बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाने ५ डिसेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या राज्य सरकारकडे प्रलंबितच असल्याने अखेर संपाचा इशारा देत हा मोठा आंदोलनात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून मोर्चा
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबितच आहेत. त्यावर ठोस निर्णय न झाल्यामुळे मुख्याध्यापक महामंडळाने मोर्चाची हाक दिली आहे. परिणामी लाखो विद्यार्थ्यांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
शिक्षकांच्या मुख्य मागण्या काय?
शिक्षकांचा आवाज यावेळी नेहमीपेक्षा जास्त ठाम आणि ठोस आहे. मागण्या पुढीलप्रमाणे—
२०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक करू नये
१५ मार्च २०२४ चा संचमान्यता शासन निर्णय रद्द करावा
जुन्या निकषानुसार संचमान्यता लागू करावी
शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी
यातील सर्वात संवेदनशील मुद्दा म्हणजे टीईटी परीक्षा अनिवार्यता. नवीन नियमानुसार सर्व शिक्षकांना टीईटी देणे बंधनकारक केले गेले आहे. परीक्षा न दिल्यास किंवा न पास झाल्यास शिक्षकांना नोकरी करू देता येणार नाही – त्यामुळे शिक्षक आक्रमक झाले आहेत.
टीईटी अनिवार्यता – शिक्षकांचा सर्वात मोठा रोष
राज्यातील हजारो शिक्षकांचे करिअर या टीईटी परीक्षेवर अवलंबून झाले आहे. दशकभरापूर्वी नियुक्त झालेल्या अनुभवी शिक्षकांनाही ही परीक्षा बंधनकारक केल्याने शिक्षक वर्ग संतापला आहे. ‘अनुभवापेक्षा परीक्षा महत्त्वाची कशी?’ असा मोठा प्रश्न शिक्षक विचारत आहेत. आणि हाच मुद्दा संपाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे.
५ डिसेंबरचा दिवस महत्त्वाचा – विद्यार्थी, पालकांनी सतर्क राहा
जर शासन आणि मुख्याध्यापक महामंडळ यांच्यात तोडगा निघाला नाही, तर ५ डिसेंबरला राज्यातील अनेक शाळा प्रत्यक्षात बंद राहू शकतात.
पालकांनी संबंधित शाळांशी संपर्कात राहणे गरजेचे आहे.
राज्यातील शिक्षण व्यवस्था नेहमीच बदलांच्या उंबरठ्यावर असते; पण या वेळी परिस्थिती वेगळी आहे. शिक्षकांच्या मागण्या योग्य असोत किंवा शासनाची भूमिका कठोर असो रोज शाळेत जाणाऱ्या लाखो मुलांच्या शिक्षणावर याचा परिणाम होणारच. अशा वेळी एकच आशा की दोन्ही बाजूनी मार्ग काढून हा संघर्ष शांततेत सोडवला जावा… कारण शेवटी नुकसान विद्यार्थ्यांचंच!