महावितरण चा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Electricity Update : गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा त्रास म्हणजे रात्री मिळणारा वीजपुरवठा. पिके फुलांच्या अवस्थेत असताना, पाणी देण्यासाठी शेतकरी अंधारात पंप सुरू करतात… कधी सापाचे धोके, कधी विजेचे अनियमित तास, कधी पंप जळण्याची भीती रोजच्या आयुष्यातला हा संघर्ष आता कमी होणार असल्याची मोठी बातमी महावितरणकडून पुढे आली आहे. राज्यातील कृषिपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणने आता सौरऊर्जेला प्रचंड गती देत नवीन धोरण लागू केलं आहे. पारंपरिक लाइन्स, खांब, ट्रान्सफॉर्मर या सगळ्यांवरचा ताण कमी करत, शेतकऱ्यांना थेट सौरऊर्जेवर तातडीने कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढे शेतात पाणी देण्यासाठी मध्यरात्री उठावं लागेल अशी चिंता अनेकांना कमी झाली आहे. Maharashtra Electricity Update

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २,७७३ मेगावॉट क्षमतेचे तब्बल ५१२ सौर प्रकल्प आधीच कार्यान्वित आहेत. म्हणजे शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेचा थेट पुरवठा आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एवढंच नाही तर राज्यात आज सहा लाख ४७ हजार सौर कृषिपंप चालू आहेत म्हणजे देशात सर्वाधिक. शेतकऱ्यांमध्येही या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. दिवसाढवळ्या, सुरक्षीत आणि स्थिर वीज मिळाली तर शेतीचं गणितच बदलतं पेरणीपासून ते पिकाच्या काढणीपर्यंत. दिवसा वीज मिळाली तर डिझेलवर चालणाऱ्या इंजिनांचा खर्च कमी होतो, पिकाला वेळेत पाणी मिळतं आणि शेतकऱ्यांचा रोजचा ताणही कमी होतो.

महावितरणने सांगितलं की त्यांच्या दीर्घकालीन वीज खरेदी करारांमध्ये आता ६५% पर्यंत अपारंपरिक ऊर्जेला, म्हणजे सौर आणि इतर नव्या ऊर्जास्रोतांना प्राधान्य दिलं जात आहे. आतापर्यंत एकूण ७२,९१८ मेगावॉट क्षमतेच्या वीजखरेदी करारांमध्ये नॉन-कन्वेन्शनल ऊर्जेचा समावेश आहे. म्हणजे भविष्यातील वीजपुरवठा अधिक स्वस्त, स्थिर आणि पर्यावरणास अनुकूल होणार आहे. राज्यात सध्या कोणत्याही प्रकारचं भारनियमन न करता विक्रमात्मक २६,४९५ मेगावॉट विजेचा पुरवठा सुरू असल्याचंही महावितरणने स्पष्ट केलं. हे सगळं सूक्ष्म नियोजन, सौर प्रकल्पांची वाढ आणि आधुनिक तंत्र वापरल्यामुळे शक्य झालं आहे.

यात आणखी एक मोठा बदल म्हणजे महावितरण आता AI तंत्रज्ञान वापरते. वीजेची मागणी किती वाढेल, कुठे कमी होईल, कोणत्या वेळी जास्त पुरवठा लागेल हा संपूर्ण अंदाज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने घेतला जातो. त्यामुळे राज्यभर वीजपुरवठा कमी खर्चात आणि अधिक अचूक नियोजनाने दिला जातो. शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जात आहे. दिवसा पाणी मिळालं म्हणजे पिकांची वाढ नीट होते, धोके कमी होतात आणि शेतीची उत्पादकता वाढते. सौरऊर्जा म्हणजे दीर्घकालीन, स्वस्त आणि स्थिर स्त्रोत त्यामुळे गावोगावी आता शेतकऱ्यांची आशा पुन्हा जागी होताना दिसतेय.

बातमी स्त्रोत : लोकमत ऍग्रो

Leave a Comment