RBI New Rules 2025 | देशात आज जवळपास प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि खिशात बँक खातं आहे. आपली रोजची धावपळ, व्यवहार, बचत… सगळं काही या बँक खात्यावरच चालतं. पण बँकांचे नियम, किमान शिल्लक, लपलेले चार्जेस, डिजिटल व्यवहारांचे फी… यामुळे सामान्य माणसाला नेहमीच त्रास व्हायचा. कधी शेतकऱ्याचं खाते मिनिमम बॅलन्स नसल्याने बंद, तर कधी एखाद्या गरीब कामगाराच्या खात्यावर दंड. हा त्रास आता संपणार आहे, कारण RBI ने एक असा मोठा निर्णय जाहीर केला आहे, ज्याचा थेट फायदा देशातील करोडो ग्राहकांना होणार आहे.
RBI ने BSBD म्हणजेच Basic Savings Bank Deposit Account या खात्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता हे खाते एक सामान्य बँकिंग सेवा मानलं जाणार असून ते पूर्णपणे झिरो बॅलन्सवर चालणार आहे. म्हणजे तुमच्या खात्यात एकही रुपया नसला तरी बँक तुमच्यावर दंड लावू शकणार नाही, खाते बंद करू शकणार नाही. मध्यमवर्गीय, शेतकरी, विद्यार्थी, कामगार… सगळ्यांसाठी हा खरा दिलासा म्हणावा लागेल.
याहून महत्त्वाचं म्हणजे MAB – Minimum Average Balance ची सक्ती RBI ने पूर्णपणे रद्द केली आहे. यामुळे अनेकांना दर महिन्याला टेंशन असायचं की खाते किमान शिल्लक ठेवायचं नाहीतर दंड बसणार. आता तेच संपलं. हा नियम देशातील सर्व बँकांना आणि सर्व ग्राहकांना लागू राहणार आहे.
मोफत सेवांच्या यादीतही दमदार बदल करण्यात आले आहेत. डेबिट कार्ड मोफत, कोणतंही वार्षिक फी नाही. वर्षाला 25 चेक पाने मोफत, त्यावर कोणताही अतिरिक्त चार्ज नाही. UPI, NEFT, RTGS, IMPS, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सगळं काही मोफत. कोणतेही हिडन चार्जेस नाहीत, हे RBI ने ठामपणे स्पष्ट केलं आहे. म्हणजे डिजिटल व्यवहार करणार्यांसाठी हा मोठा आनंदाचा धक्का.
महिन्याला ATM किंवा शाखेतून पैसे काढण्याचीही मुभा देण्यात आली आहे. महिन्याला एकूण 4 व्यवहार पूर्णपणे मोफत, त्यानंतर सामान्य शुल्क. पण सर्वात मोठी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे UPI व्यवहार या चार मर्यादेत मोजले जाणार नाहीत. म्हणजे कितीही डिजिटल पेमेंट करा, ते पूर्णपणे फ्री.
तुमच्याकडे आधीपासून असलेलं सामान्य बचत खाते तुम्ही 7 दिवसांत मोफत BSBD मध्ये बदलू शकता. आणि जर तुमचं BSBD खाते आधीच असेल, तर नव्या सर्व सुविधा तुम्हाला लगेच लागू होतील. हे बँकांना बंधनकारक आहे.
हो, एक गोष्ट लक्षात ठेवा एका व्यक्तीला फक्त एकच BSBD खाते उघडता येईल. खाते उघडताना एक साधं स्व-घोषणापत्र द्यावं लागेल आणि सुरूवातीला एक रुपयाही लागणार नाही. पूर्ण KYC मात्र बंधनकारक आहे. डेबिट कार्ड किंवा चेकबुकही फक्त ग्राहकाने मागितल्यासच दिले जाणार, जबरदस्ती अजिबात नाही.
खरं सांगायचं तर BSBD आता देशातील सर्वात स्वस्त, सर्वात सोपं आणि सर्वात उपयुक्त झिरो बॅलन्स खाते बनलं आहे. गरीब असो वा श्रीमंत, विद्यार्थी असो वा शेतकरी सर्वांसाठी हे मोठं पाऊल आहे. बँकिंग आता खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या आवाक्यात येत आहे.
एक गोष्ट मात्र खरी पैशांचं व्यवस्थापन, बचत आणि डिजिटल व्यवहार हे आता आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झालेत. RBI चा हा निर्णय म्हणजे बँकिंग जगतातील एक क्रांतीच म्हणावी लागेल. सामान्य माणूसही आता निडरपणे बँकिंग करू शकेल, हेच खऱ्या बदलाचं चिन्ह आहे