१ डिसेंबरचा भारी धडाका! कर, पेन्शन, विमानभाडं, एलपीजीचे नवे नियम  सामान्य माणसाला लागणार मोठा फटका?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 December Rules Change | दरम्यान, वर्षाचा शेवटचा महिना सुरू होण्याआधीच सामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वाचे बदल लागू होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. कर, पेन्शन, एलपीजीचे दर आणि विमान प्रवासाचा वाढू शकणारा खर्च… या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम घरखर्चावर आणि मन:शांतीवर होणार, अशी चिंता अनेकांना वाटतेय. नोव्हेंबर संपण्याआधी काही आवश्यक कागदपत्रं सादर केली नाहीत, तर पेन्शन रोखण्यापासून ते कर विभागाकडून नोटीस येण्यापर्यंत अनेक त्रास ओढवू शकतात. म्हणूनच वेळेत बदल समजून घेणं गरजेचं आहे.

युनिफाइड पेन्शन स्कीममध्ये सामील होण्याची ३० नोव्हेंबर ही शेवटची संधी असल्याने अनेक सरकारी कर्मचारी धावाधाव करत आहेत. एनपीएसमधून युपीएसमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांनी सीआरए पोर्टलवर तातडीने अर्ज करणे बंधनकारक आहे. तारीख चुकली तर पुढची संधी मिळेपर्यंत थांबणं भाग आहे, ज्यामुळे अनेकांचा प्लॅन अडकू शकतो.

कर भरण्यात थोडाही विलंब झाला तर त्याची किंमत दंडाने चुकवावी लागू शकते. नोव्हेंबर महिना करदात्यांसाठी नेहमीच टेन्शनचा असतो. टीडीएस स्टेटमेंट्स (कलम १९४-आयए, १९४-आयबी, १९४एम, १९४एस) दाखल करण्याची ३० नोव्हेंबरची अंतिम तारीख जवळ येत आहे. ट्रान्सफर प्राइसिंग रिपोर्ट (कलम ९२ई) तसेच परदेशी कंपन्यांचा फॉर्म ३ सीईएए दाखल करणे आवश्यक आहे. तारीख चुकली तर दंड, व्याज आणि आयकर विभागाची नोटीस – सगळंच एकत्र दार ठोठावू शकतं.

दरम्यान, विमान प्रवास करणाऱ्यांसाठीही १ डिसेंबरचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. विमान इंधनाच्या किमतींचा आढावा घेतला जाणार असून दर वाढले तर तिकिटांचे भाव वाढण्याची शक्यता आहे. देशांतर्गत असो वा आंतरराष्ट्रीय – प्रवास महाग होण्याची शक्यता आधीच चर्चेत आहे. वर्षाखेरच्या सुट्ट्यांचा आनंद घेतानाच वाढत्या खर्चाचा ताण जाणवू शकतो.

पेन्शनधारकांनीही सावध राहण्याची गरज आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत लाइफ सर्टिफिकेट सादर न केल्यास डिसेंबरपासून पेन्शन थांबू शकते. अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक संवेदनशील मुद्दा आहे. प्रमाणपत्र बँक, पोस्ट ऑफिस किंवा मोबाइल अॅपद्वारे सहज सादर करता येत असलं तरी वेळेत न केल्यास अडचणी वाढू शकतात.

१ डिसेंबरला एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही बदल अपेक्षित आहे. कमर्शियल सिलिंडर काहीसा स्वस्त झाला असला तरी घरगुती ग्राहकांचे लक्ष घरच्या बजेटवर परिणाम करणाऱ्या या नव्या बदलांकडे लागलेलं आहे. दर वाढले तर स्वयंपाकघराचा खर्च थेट वाढणार, यात शंका नाही.

सामान्य माणसाचं आयुष्य म्हणजे नियोजन, बचत आणि कधीही न सांगता एकदम येऊन पडणाऱ्या नव्या नियमांचं ओझं. डिसेंबरची सुरुवात होण्याआधी हे सगळे बदल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण छोटासा दुर्लक्षही मोठा फटका देऊन जाईल. शेवटी, काळ बदलतोय… आणि बदलांचा फटका सर्वात आधी सामान्य जनतेलाच बसतोय.

Leave a Comment